अधिकारी कर्मचा-यांवर वचक ठेवण्याची पालिका आयुक्तांकडे केली मागणी
डोंबिवली/ प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही गंभीर बाब असून यासाठी प्रत्येक नागरिकांची डोअर टू डोअर थर्मल स्क्रिनिंग तपासणी युध्दपातळीवर करण्यात यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे अशी भिती वजा मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच रूग्णाांचे रिपोर्ट वस्तुस्थितीला धरून नसल्याने कोरोना रूग्णांचा आकडा वाढत असल्याचा गंभीर आरोपही नगरसेवक म्हात्रे यांनी निवेदनात केल्याने खळबळ उडाली आहे.
महापालिका क्षेत्रात करोनाबधित रूग्णांचा आकडा १० हजाराच्या पार गेला आहे. आतापर्यंत ६ हजार रूग्णांनी कोरोनावर मात केली आहेत ५२९२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण संख्येबरोबरच मृत्यूची संख्या वाढत असून आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा १७२ वर पोहचला आहे. पालिका आयुक्तांसह अधिकारी व कर्मचारी हे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र पालिका अधिका-यांकडून आपल्याकडे जी माहिती पुरवली जाते ती २५ टक्के पुरविली जाते आणि शंभर टक्क्याचा अहवाल आपल्याला दिला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांवर वचक राहावा असेही म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच आरोग्य खात्याचे निम्मे कर्मचारी हे हप्त्यावर असून हजेरी लावण्यानंतर निघून जात आहेत. त्यांच्यावर कोणाचाही अंकूश नाही त्यामुळे कोणताही अधिकारी कम्रचारी हलगर्जीपणा करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून खोटे रिपोर्ट दिले जाणार नाही याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.