ठाणे दि.६ : कोरोनावर मात करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीची जिद्द निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे. त्यांनी आज दुरदृश्यप्रणाली द्वारे जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांशी संवाद साधला.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत निहाय प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरण्यावर भर देताना कुटुंब सर्वेक्षण पथक तयार करणे, विलगीकरण कक्ष स्थापन करणे, कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक तयार करणे , कोविड हेल्पलाईन पथक तयार करणे आणि कोविड १९ लसीकरण पथकाची निर्मिती करणे या पंचसूत्रीनुसार गावात काम होईल याचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे दांगडे यांनी सांगितले. तसेच या पंचसुत्रीनुसार काम करणाऱ्या ग्रामपंचायतला कोरोनामुक्त गाव स्पर्धेत हमखास यश मिळेल असेही ते म्हणाले.
‘ आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रम राबवणार
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रमही प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात उत्साहाने राबविण्याचे आवाहन दांगडे यांनी केले आहे. कोरोना नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन करून या उपक्रमानिमित्ताने विविध कार्यक्रम ग्रामपंचायतस्तरावर घेण्यात यावेत असेही ते म्हणाले. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून दोन्ही उपक्रमाबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना विस्तृत माहिती दिली. या संवादाच्या कार्यक्रमाला सरपंच, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.