ठाणे /अविनाश उबाळे : ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गा लगत असलेल्या कानविंदे जवळील वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या स्व.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे. वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हे जैवविविधता उद्यान आता अखेरच्या घटका मोजत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जैवविविधता केंद्र हा बासनात गुंडाळून शहापूर वनविभागाने येथे चक्क खर्डी वनपरिक्षेत्राच्या काष्टी वन परिमंडळची रोपवाटीका तयार करण्याचा पराक्रम शहापूर वनविभागाने केल्याचे वास्तव उजेडात आले आहे.वनविभाग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जैवविविधता केंद्रासाठी खर्च करण्यात आलेला सरकारचा जवळपास ८९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी अक्षरशःपाण्यात गेला आहे.
निसर्गाचा अमूल्य ठेवा लाभलेल्या शहापूर तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून वनविभागाच्या ठाणे सामाजिक वनीकरण विभागाने २०१५ /१६ या आर्थिक वर्षात वन व वनेतर जमिनीवर स्व.उत्तमराव पाटील वन उद्यानाची निर्मिती करुन जैवविविधता व निसर्ग संरक्षण योजना राबवली. शहापूरातही पहिले जैवविविधता उद्यान म्हणून मुंबई-नाशिक महामार्गालगत पेंढरघोळ नजीकच्या कानविंदे गुरचरण नंबर १३८ मध्ये १२.१० हेक्टरमध्ये सुशोभीकरणाचे आणि वृक्ष लागवडीचे काम केले होते.
मुंबई,नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या व इतर शहरांतील पर्यटकांना या जैवविविधता केंद्राचा लाभ घेता यावा यासाठी अनेक दुर्मिळ अशा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या उद्यानात निसर्ग अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि लहान मुलांना खेळाचे साहित्य उभारण्यात आले होते त्याचबरोबर. वृक्ष-तलावांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित होते.
यांत औषधी वनस्पती उद्याने, फुलपाखरू उद्यान, दिशा उपदिशा उद्यान, स्मृतिवने, सुगंधीद्रव्य उद्यान, बांबू सेटम, काटेरी झुडपी वृक्ष समूह उभारुन पर्यावरण अभ्यासास चालना मिळणार होती.याठिकाणी मुलांसाठी मनोरंजन खेळणी,ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती व फिरण्यासाठी निसर्ग पायवाटा आदी सुविधा करण्यात आल्या होत्या. परंतु राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे जैवविविधता उद्यानाला अवकळा आली असून पर्यटकांअभावी हे उद्यान ओसाड पडले आहे.
या उद्यानात उभारण्यात आलेले खेळाचे लोखंडी साहित्य गंजून मोडकळीस आले आहे. तर पर्यटकांसाठी बांबूपासून तयार केलेल्या वनकुटया देखभाली अभावी उध्वस्त झाल्या आहेत. पाण्यासाठी तयार करण्यात आलेला तलाव पाण्या अभावी कोरडाठाक पडला आहे. येथील सौर ऊर्जा यंत्रणेची देखील दैन्यावस्था झाली आहे. उद्यानाला प्रचंड गवत,पालापाचोळा,झाडाझुडपांनी अक्षरशः वेढा घातला आहे. एकूण ८९ लाख ८९ हजार रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही केवळ वन विभागातील सामाजिक वनीकरणाच्या सरकारी बाबूंच्या बेफिकिरीमुळे हा जैवविविधता केंद्र नामशेष झाल्याचे भयानक असे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे सध्या हा जैवविविधता केंद्र शहापूर प्रादेशिक वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.परंतु उद्यान देखभालीसाठी निधी मिळत नसल्याचे कारण देत खर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने या जैवविविधता उद्यानाचे चक्क रोपवाटिकेत रूपांतर केल्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आला आहे.
कानविंदे जैवविविधता केंद्राच्या नावाखाली ठाणे सामाजिक वनीकरण विभागाच्या तत्कालीन वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी हा लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे स्पष्ट होत आहे.जैवविविधता केंद्रासाठी खर्च करण्यात आलेला सरकारच्या लाखो रुपयांचा चुराडा झाल्याने यामुळे सरकारच्या जैवविविध केंद्र उभारण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.
कानविंदे उद्यानासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने या उद्यानात काष्टी वन परिमंडळाची रोपवाटिका सुरू केली आहे. – लक्ष्मण चिखले वनपरिक्षेत्र अधिकारी खर्डी
जैवविविधता उद्यानाची शासनाच्या नियोजनानुसार उभारणी केली असती तर पर्यटनासाठी पर्यटकांना त्याचा निश्चितच लाभ झाला असता.परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे उद्यानासाठी केल्याला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. –काशिनाथ तिवरे सामाजिक कार्यकर्ते शहापूर