बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, वेणूगोपाल यांनी ठणकावले
मुंबई, दि. १९ जुलै : विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून, काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस कार्यकत्यांना दिला. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज गरवारे क्लब येथे पार पडली त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली मात्र कोणत्या आमदारांवर काय कारवाई केली याची माहिती गुलदस्त्यात आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, सरचिटणीस प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित.
बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना खा. के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार असेही त्यांनी ठणकावले.
वेणुगोपाल म्हणाले की, राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोट निवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. पण तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येनंतर बद्रिनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे असे चित्र राज्यात आहे.
जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केला असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत विधानसभा तयारीसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्ष संविधान लोकशाही व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची लढाई करणार आहे. आम्ही महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची संपत्ती आणि मुंबई गुजरातला विकू देणार नाही. २० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार असून काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे उपस्थित राहणार असून याच दिवशी विधान सभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. महाराष्ट्राची वाट लावणा-या महाभ्रष्ट युती सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हाच काँग्रेसचा संकल्प आहे.