स्थानिक भूमिपुत्रांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस कटीबध्द : नाना पटोलेंचे आश्वासन

डोंबिवली : आगरी, कोळी, शेतकरी भूमिपुत्रांवर विविध प्रकारे अन्याय झाला मात्र आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस कटीबध्द आहे असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिपुत्रांच्या एका बैठकीत दिले.

आगरी काळी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रसेचे सचिव आणि भूमिपुत्रांचे नेते संतोष केणे यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. विविध समस्या भूमिपुत्रांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्या जाणून घेत सोडविण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिले. सदर बैठकीला विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भूमिपुत्रांनी या समस्या मांडल्या …

२७ गावातील विविध प्रश्न, १० गावातील ग्रोथ सेंटर, भिवंडी शिळ रोड बाधितांना भूसंपादन कायदा २०१३ नुसार मोबदला मिळावा, अलिबाग वसई कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, नेवाळी-भाल येथील डंपिंगचा प्रश्न आणि जागेवरी आरक्षण, गावठाण कोळीवाडे, गावठाण विस्तार, क्लस्टर, बाळकूम कोलशेत ढोकाळी घोडबंदर येथील भूसंपादनाचा विषय तसेच माजिवडा ग्रामविकास फार्मिंग सोसायटीचे प्रश्न, मुंब्रा रेतीबंदर येथील फ्लॅाट धारकांचे विविध प्रश्न, डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील मौजे आयरे येथील ४० वर्षापासून भूमिपुत्रांच्या ताब्यात असलेल्या जमिनीबाबत , डोंबिवली येथील प्रीमिअर कंपनी नोक-या देण्याच्या अटी शर्थीवर लेखी कराराचा भंग करून बांधकाम व्यावसायिकांना विक्री केल्याबाबत, प्रॉपर्टी कार्ड सनद सिमांकन नवी मुंबई, भंडार्ली येथील डंपिंगचा प्रश्न आदी मागण्या मांडण्यात आल्या.

वेळ पडल्यास भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरू : संतोष केणे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यात भूमीपुत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. तसेच पालकमंत्री हे पालक आहेत या जिल्ह्याचे आणि त्यांचे चिरंजीव हे खासदार आहेत. मी कोणावर आरोप करत असताना विषय हे समाजाचे आहेत, भूमिपुत्रांचे आहेत आणि जनआक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे हे समजून घ्यावे. ज्यांना जनतेने सत्तेवर बसवलं आहे, त्यांना न्याय देण्याच काम सत्ताधाऱ्यांचं आहे आणि लोकांच्या मागणीसोबत काँग्रेस आहे. मागील वेळेस कल्याण-शीळ रस्त्याची बैठक झाली त्यावेळी त्यांनी एक समिती बनवली आणि आश्वासन दिलं. मात्र सत्ताधाऱ्यांनी दिलेलं कोणतंच आश्वासन पूर्ण केलं जात नाही अशी खंत केणे यांनी व्यक्त केली. वेळ पडली तर भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आवाज उचलू आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरून सुद्धा लढा देऊ असे केणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *