आगरी कोळी भूमिपुत्रांच्या समस्या संदर्भात
काँग्रेस नेते संतोष केणे यांनी घेतली
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट
डोंबिवली (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रकल्पासाठी मुंबई ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी भूमीपुत्र शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहे मात्र त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी काँग्रेसचे नेते आणि आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार संतोष केणे यांनी सोमवारी( २२ जुलै) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईतील गांधी भवन येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी थोरात यांनी दिले.
बुलेट ट्रेन, कॉरिडॉर प्रकल्प, २७ गावातील ग्रोथ सेंटर,कल्याण शीळ रस्ता रूंदीकरण आदी प्रकल्पात भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित होत आहे. तसेच नेवाळी विमानतळ परिसरातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविणे, मुंबई, ठाणे क्लस्टर योजना आणि गावठाण जमिनी व कोळी वाड्याचा प्रश्न, बाळकूम परिसरातील भूसंपादन करून शेतकऱ्यांना नोकऱ्या देतो सांगून फसवणूक तसेच डोंबिवलीतील प्रीमिअर कंपनीसाठी जागा संपादन करून फसवणूक, लोढा बिल्डरकडून जमिनी बळकावून शेतकऱ्यांची फसवणूक, भाल गाव येथील 250 एकर वरील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न तसेच करवले, डायघर गावातील डम्पिंग ग्राऊंडची समस्या, दिवा मुंब्रा कळवा येथील टोरोंटो कंपनीकडून आंदोलनकर्त्याना बैठकीचे आश्वासन देऊन चालढकल, पारंपरिक रेती व्यवसायिकांवरील अन्यायाबाबत आदी विषयाचे निवेदन केणे यांनी सादर केले.
*****