मुंबई, दि. १२ ऑगस्ट : देशातील महत्वाची व गोपनीय माहिती दुश्मन देशाला पुरवणारा व्यक्ती हा देशद्रोहीच आहे. प्रदीप कुरुलकर यानेही अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे, पण त्याच्यावर अजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही गंभीर आरोप करीत, भाजपच्या हेतूवरच निशाणा साधला. राऊत म्हणाले, ज्याच्यावर देशद्रोहाचा कायदा लावला पाहिजे होता त्याला लावला नाही. पुण्यात डॉ. कुरुलकर आहेत. त्याने इथे बसून पाकिस्तानला आपल्या डिफेन्सचे सिक्रेट विकले आहेत. तो संघाचा हार्डकोअर कार्यकर्ता आहे. त्याला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा कायदा लावला नाही. त्याला वाचवण्यासाठी देशद्रोहाचा हा कायदा रद्द केला आहे, असा गंभीर आरोपच संजय राऊत यांनी केला आहे.
पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रागतिक तसेच पुरोगामी विचारांच्या संस्था व पक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पटोले म्हणाले की, भाजपा सरकारमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळा कायदा लावला जातो. संभाजी भिडे जाहीरपणे दुसऱ्याच्या धर्मावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतो पण त्याच्याविरोधात कारवाई केली जात नाही, कारण भाजपाला तेच हवे आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा या लोकांच्या माध्यमातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली असून मित्रपक्षात काय चालले आहे त्यात आम्हाला काही रस नाही, जे पक्ष भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लढणार आहोत, आणि शरद पवार या लढाईत काँग्रेसबरोबर असतील असा आमचा विश्वास आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अहंकार भरलेला आहे, संसदेत अविश्वास ठरावावर बोलताना राहुल गांधी यांनीही या अहंकाराची देशाला होत असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. नरेंद्र मोदी स्वतःला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठे समजू लागले आहेत. हा अहंकार लोकांना आवडत नाही, मोदींच्या लोकप्रियतेमध्ये दररोज घसरण होत आहे. संसदेत राहुल गांधी यांनी ३४ मिनीटांचे भाषण केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासापेक्षा जास्त भाषण केले पण जगभरातील लोकांनी राहुल गांधी यांच्याच भाषणाला जास्त पसंती दिली, मोदींच्या भाषणकडे जनतेने दुर्लक्ष केले, जनता मोदी सरकारला कंटाळली आहे त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तर देशात परिवर्तन होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.
स्वातंत्र्य चळवळीत अनेक व्यक्ती, सामाजिक संघटनांनी घरावर तुळसीपत्र ठेवून मोठा संघर्ष केला, त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, हा त्याग व बलिदान याचा विसर पडता कामा नये. आजही सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा पुण्यात आले त्याला काही संघटनांनी विरोध केला त्याचा संदेश देशभरात गेला. आताही आपल्याला या हुकुमशाही शक्तीच्या विरोधात एकत्र येऊन लढायचे आहे, असे नाना पटोले म्हणाले.
या बैठकीत नाना पटोले बोलत होते. या बैठकीला पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.