महाड : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष आणि महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा निधन झालं. ते ५४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

माणिकराव जगताप यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी कॅप्टन जगताप बंगला महाड येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विदयार्थी दशेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. युवक कॉंग्रेसपदे त्यांनी आपल्या कामाची छाप दाखवली. उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत महाड मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. सध्या जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

उत्तम सहकारी व मित्र गमावला : नाना पटोले
माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाने अनेक निकटवर्तीयांना आपल्यापासून हिरावून घेतले आहे. माणिकराव कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील असे वाटत असतानाच त्यांचा निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. माणिकराव हे उत्तम वक्ते, कुशल संघटक होते. ते सर्वांना बरोबर घेऊन काम करत, लोकांचे प्रश्न हिरीरीने मांडत. कोकणात काँग्रेस पक्षाचे संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थी असताना एनएसयुआयमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले. २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी महाड मतदार संघातून विजय संपादन केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी केले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे अशी भावना पटोले यांनी व्यक्त केली

कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड: अजित पवार, उपमुख्यमंत्री
माजी आमदार, आमचे मित्र, सहकारी माणिकराव जगताप यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्यांच्या निधनाने जनमाणसाचं प्रेम लाभलेला, रायगड जिल्ह्याचा, कोकणचा कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. माणिकराव यांच्या कन्या स्‍नेहल, सुपुत्र श्रीयश आणि संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *