डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलातील नोकरीच्या संधी या विषयावर निवृत्त मेजर विनय देगावकर यांचे व्याख्यान पार पडले. सैन्य दलातील विविध पदे व भरती प्रक्रिया या विषयावर हे व्याख्यान शाळेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहामध्ये संपन्न झाले. इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय सैन्य दलाचे विविध विभागाचे कामकाज कसे चालते, यासाठी आपण कशा पद्धतीने शारीरिक व मानसिकरित्या तयार व्हावे याचे मार्गदर्शन देगावकर यांनी करतानाच लष्करामध्ये सैनिक व अधिकारी या दोन्ही पदासाठीची निवड कशी होते त्यासाठी किती शिक्षण लागते ते सांगितले. अगदी ब्रिटिश काळात सुरू झालेलं भारतीय लष्कर ते आत्ताचे सैन्य दल इथपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. भारताचे सर्वात जास्त सैनिक हे उत्तर भागातील सीमेवर आहे. भारताने पाकिस्तान, चीन यांच्याबरोबर झालेल्या युद्धात कशाप्रकारे जिंकलो ते सांगितले.
सैन्य दलातून परमवीर चक्र , अशोक चक्र अशी मानाची शौर्यपदके मिळवलेल्या सैनिकांची माहिती त्यांनी दिली.
त्याचबरोबर सैन्य दलात अभियंता म्हणून कार्य करताना आलेल्या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.तर अजूनही पालक आपल्या मुलांना सैनिक म्हणून पाठवण्यास धजावत नाहीत ही खंत त्यांनी बोलून दाखवली.यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन त्यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा बोंडे , ज्येष्ठ शिक्षक लजपत जाधव हे उपस्थित होते . तर सूत्रसंचालन छाया भालेराव यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था मधुरा सावंत व संदीप भावे यांनी पाहिली. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उपस्थित होते.