दोषी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करून, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा मनसेची मागणी
ठाणे, दि. १७ (प्रतिनिधी) : ठाणे पालिकेच्या नगर अभियंता विभागाला हाताशी धरून रस्ता मंजूर केला, त्यासाठीचा निधीही खर्च केल्याचे दाखविले पण हा कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेला काँक्रीटचा रस्ता भिंत बांधून बंदिस्त करत चक्क पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप मनसेने केलाय. पालिका आयुक्तांनी याप्रश्नी चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करावे व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. तसेच हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बांधला असून तो त्यांच्यासाठी खुला करावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी पालिकेला दिला आहे.
लोकमान्यनगर परिसरातील तरण तलावला लागूनच या रस्त्यावर सुमारे सव्वा कोटी खर्च करण्यात आला.हा रस्ता सेवा रस्तामध्ये येत असून या प्रभाग समितीतील कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी कोट्यवधी खर्च करून हा बांधलेला रस्ता भिंत बांधून बंदिस्त केला असल्याचा आरोप मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. तसेच या रस्त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवरच भिंत बांधून रस्ता पूर्णपणे बंद केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या प्रश्नी नगरअभियंता यांना वारंवार निवेदन देऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतरही हे काम आम्हाला माहित असून या जागेची ठाणे पालिका मालक आहे, त्यामुळे त्या जागेवर काहीही करू शकतो अशी उत्तरं देत हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या बांधलेल्या भिंतीबाबत महापालकेच्या कोणत्याही दस्ताऐवजवर नोंद नसून कोणतीही निविदा नसताना ठेकेदाराकडून बेकायदेशीरित्या बांधलेली असल्याचे समोर आले आहे. पालिकेचे अधिकारीच पदाचा गैरवापर करत सेवा रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी हक्कासाठी कोणाचे दरवाजे ठोठवायचे ? असा सवाल महिंद्रकर यांनी उपस्थित केलाय.
————–
काय आहे पालिकेचे म्हणणे …
आकृती हबटाऊन येथील तलावाचे अॅमिनीटी प्लॉट वरील तरण तलावाचे काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. सदर तरण तलावाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून तसेच अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे व अनधिकृत वाहने उभी न राहण्याच्या दृष्टीने सदर तरण तलावाशेजारी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. सदर रस्ता हा कोरस नक्षत्र होस्पिटल ते वर्तकनगर असा डी.पी. रस्ता २०.०० मी. चा आहे. त्यामधील तरण तलावाजवळील जाणारा रस्ता मोकळा असल्याने त्या रस्त्याचे जागेत काँक्रीटीकरण करण्यात आलेला आहे. उर्वरित डी. पी. रस्त्यामध्ये मोठ-मोठ्या इमारती तसेच घरे बाधीत होत आहेत, त्यामुळे या सर्वांचे पुनर्वसन झाल्यानंतरच उर्वरित रस्ता करता येणार आहे. व त्यासाठी भविष्यात बराचसा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सदस्य यांचे सुचनेनुसार तरण तलावाजवळील करण्यात आलेल्या रस्त्यावर गैरवापर, अतिक्रमण, बेवारस पार्किंग तसेच तरण तलावाचे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून भिंत बांधण्यात आलेली आहे. डी. पी. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सदरची भिंत काढून रस्ता मोकळा करण्यात येईल. त्यामुळे सदरची जागा ही महापालिकेची असल्याने कोणतेही अतिक्रमण करण्यात आलेले नाही असे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
*****