मुंबई : कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे ठाकरे यांनी सांगितले. डोंबिवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या करोनाबाधित व्यक्तीची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे.
परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांना देखील यासंदर्भात अवगत करण्यात यावे यावर बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असे सांगितले.
तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा का याबाबत देखील चर्चा झाल्याचं टोपेंनी स्पष्ट केलं आहे. डोंबिवलीमध्ये आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची तब्बेत आज चांगली असून ही व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आली आहे. त्यांच्यामधील जिनोमिक सिक्वेन्सींगसाठीचा स्वाब हा चाचणीसाठी पाठण्यात आला आहे. याबाबतची माहिती लवकरच प्राप्त होईल तसेच या केसकडे विशेष लक्ष ठेवलं जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत घाबरु नका पण पूरेपुर खबरदारी व काळजी घ्या !
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
दक्षिण आफ्रिका येथून आलेला एक 32 वर्षाचा इसम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे, याबाबतची माहिती महानगरपालिकेस संबंधित लॅब कडून प्राप्त होताच सदर व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सदर इसमाच्या 8 जवळच्या नातेवाईकांची करोना चाचणी केली असता त्यांचे सर्वांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले असून सदर बाब दिलासादायक आहे.
सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. परदेशात इतरत्र ओमीक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता, महानगरपालिका क्षेत्रातही महापालिकेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा व आपले कोविड लसीकरण वेळीच करून घ्यावे व संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत न घाबरता पुरेपुर खबरदारी व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे मार्फत करण्यात येत आहे.
