डोंबिवली, दि,10 : अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदारच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घडलेल्या प्रकाराने तक्रारदार व त्याचे कुटुंब भयभीत झाले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे हे कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु झाले. सुधाकर पावशे यांनी या प्रकरणाची तक्रार महापालिकेकडे केल्यानंतर महापालिकेने कारवाईचे आश्वासन दिले. मात्र कारवाई केली नाही. दरम्यान सुधाकर पावशे यांच्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली. लोक आयुक्तांनी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकीचे कारण देत कारवाई टाळली. पावशे यांनी पाठपुरावा केल्यावर केडीएमसीने मंगळवारी सकाळी कोपरमधील या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली.महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर सुधाकर पावशे यांच्या घरासमोर काही महिला आल्या. महिलांनी आरडाओरड करत सुधाकर पावशे यांना घराबाहेर या असे सांगितले. पावशे घराबाहेर आले नाही म्हणून महिलांनी त्यांचे दार जोरजोरात ठोठावले. तसेच त्यांची नेमप्लेट तोडली. घराच्या बाहेरच्या वस्तूंची नासधूस केली. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिलांच्या विरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भूमाफिया माझ्या घरावर हल्ला करतात. या भुमाफियाला शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवक पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार सुधाकर पावशे यांनी केला. आम्ही घराबाहेर पडून शकत नाही. पोलीस आणि सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यानी या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी पावशे यांनी केली आहे.