डोंबिवली : ईगल ब्रिगेड फाऊंडेशन, द फर्गिव्हनेस क्लब, प्राणिक हीलिंग परिवारासह डोंबिवलीतील इतर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संवाद कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अपंग, अनाथ, वंचित आणि गरजू व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी भाषा, तसेच संवाद कौशल्यात सुधार होणे गरजेचे आहे. या हेतूने प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिरात 50 हून अधिक सदस्य आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते तथा ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला.
तरुणांच्या कौशल्यात वाढ होऊन त्यांना अधिकाधिक रोजगार प्राप्त व्हावेत, तसेच या मार्गाने वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर प्रतिबंध घालणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते आणि विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी शिबिरातील उपस्थितांना मार्गदर्शन केले. काही महिन्यांच्या कालावधीत या प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या शिबीर संदर्भात संस्थेच्या संपर्कात रहावे, असे आयोजकांनी आवाहन केले.