कल्याण, दि. २५ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राबरोबरच राज्यभरातील महापालिका क्षेत्रातील मतदार यादीतील दोष व त्रूटींबाबत पडताळणी करून मतदारांचे विभाग व पत्त्याबरोबरच प्रभागानुसार मतदार यादी तयार करावी, अशा सुचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये काही प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावे तिसऱ्या प्रभागात गेली होती. त्यामुळे मतदारयादीत नाव असूनही शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची भीती होती. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत ७ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक घेतली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी निवडणूक विभागाचे मतदारयादीतील गोंधळाकडे लक्ष वेधले. तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची ११ नोव्हेंबर रोजी भेट घेतली होती. तसेच त्यांचे महाराष्ट्रातील महापालिकांच्या मतदारयाद्यातील दुरुस्तीकडे लक्ष वेधले होते. त्याला राजीवकुमार यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याबाबत राज्यातील निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले होते.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मतदारनोंदणी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची ऑनलाईन विशेष बैठक घेतली. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून मतदारयादीतील दोष व त्रूटींबाबत पडताळणी करून मतदारांचा सेक्शन, पत्ता यामध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रभागनिहाय मतदारयादी करण्याच्या सुचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!