राष्ट्रीय मानव हक्क मंचची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भिवंडी :- भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ५ चे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सोमनाथ बुध्या सोष्टे यांनी महानगरपालिकेच्या अकाउंट विभागातून सफाई कामगारांच्या पगारासाठी लाखो रुपये आगाऊ उचलून त्या रकमेचा स्वतःच्या हितासाठी गैरवापर केल्याप्रकरणी सखोल व सविस्तर चौकशी करून व त्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र निश्चित करून त्यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करणेबाबत अथवा बडतर्फ करणेबाबत राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्या प्रकरणी सहाय्यक आयुक्त सोष्टे यांच्या वेतनातून सदर रक्कम वसूल करण्याचे आदेश आयक्तनी दिले आहेत त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

प्रभाग समिती क्र. ५ चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बुध्या सोष्टे यांनी सन २०१९ ते २०२३ दरम्यान महानगरपालिकेतील नाले व गटारी सफाईसाठी घेतलेली रक्कम रुपये ३२,६६,३४६/- रोख अग्रीम रक्कम महानगरपालिकेच्या लेखा विभागास प्राप्त झाले नसल्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी सदर रक्कम सहा. आयुक्त सोमनाथ सोष्टे यांच्या वेतनातून वसूल करण्यासाठी आदेश दिलेले आहे. सदर आदेशामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे.

सदरची रक्कम नाले व गटारी साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कामगारांच्या पगारासाठी काढण्यात आली होती. परंतु प्रभाग समिती क्र.५ चे सहा. आयुक्त सोमनाथ बुध्या सोष्टे यांनी सदरची रक्कम नाले व गटारी याची सफाई करणाऱ्या कामगारांना न देता सदर रकमेचा स्वतःच्या कुटुंबासाठी गैरवापर करून सदर रकमेचा अपहार केला व महानगरपालिकेची व पर्यायाने शासनाची फसवणूक केली आहे. ही बाब अध्यक्ष, शरद काशिनाथ धुमाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर बाबतचे कागदपत्र महानगरपालिकेकडून मिळविले असता सहाय्यक आयुक्त सोष्टे यांनी अकाउंट विभागातून सदर रक्कम काढल्याचे व सदर रकमेचा स्वतःसाठी गैरवापर केल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले असता धुमाळ यांनी सदर बाबत सखोल व सविस्तर चौकशी करण्यासाठी व संबंधित सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
तत्पूर्वी सदर प्रकरणी धुमाळ यांनी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. पालिका आयुक्तांनी धुमाळ यांच्या पत्राची कोणतीही चौकशी केली नाही, उलट सोष्टे यांना अप्रत्यक्षपणे पाठीशी घातले. त्यामुळे अखेर धुमाळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली असता मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशावरून महानगरपालिका आयुक्तांनी सदर बाबत चौकशी केली असता, सदर रकमेचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मनपा आयुक्तांनी सदरची रक्कम सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांच्या पगारातून वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांनी महानगरपालिकेच्या लेखा विभागातून घेतलेली अग्रीम रक्कम लेखा विभागात सादर न केल्याने महापालिकेने दिनांक १७/०९/२०२३ रोजी नोटीस बजावली आहे. परंतु सदरची नोटीस बजावून देखील सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांनी कोणताही खुलासा महापालिकेस आज पर्यंत सादर केला नसल्याने महापालिका आयुक्तांनी सदरची रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेश दिलेले आहे. सदर प्रकरणी राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे तक्रार करून सहाय्यक आयुक्त सोष्टे यांना निलंबित अथवा बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!