मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यां साठी राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामार्फत नवीन सरकारी महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परिक्षेच्या तयारीसाठी सीमा भागात प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र उभारण्याबाबत शासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. दरम्यान, तलाठी भरतीप्रमाणेच इतर पदांबाबात संधी देण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे तलाठी भरतीसाठी संधी दिली होती. त्याचप्रमाणे इतर पदांच्या भरतीबाबत शासन त्यांना संधी देता देईल का, उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण केन्द्र उभारणार का, तसेच सरकारी महाविद्यालय स्थापन करणार का, असा प्रश्न निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी प्रश्न परिषदेत विचारला. मंत्री बावनकुळे यांनी यावर उत्तर दिले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ३९१ विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीसाठी अर्ज सादर केले होते. त्या सर्वांना संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर रोजगारासाठी शासनाने आदेश काढून निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी, नोकरीकरिता मुभा देण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्या भूमिकेनुसार सीमा भागातील उमेदवारांना तलाठी भरतीसाठी सामावून घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परिक्षांच्या तयारीसाठी सीमा भागात प्रशिक्षण केंद्र व कौशल्य विकास केंद्र निर्माण केले जातील, असे आश्वासनही बावनकुळे यांनी सभागृहात दिले.

महाविद्यालयाची स्थापना करणार

महाविकास आघाडी सरकारने सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. तत्कालीन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही नेमली. परंतु, पुढे काहीच झालेले नाही. सरकारने याबाबत पुढाकार घेऊन पावले उचलावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. याबाबत पुढे काहीच कार्यवाही झाली नसेल, तर महायुती सरकार सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठांतर्गत महाविद्यालय स्थापन करील, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!