ठाणे, दि.28 : ठाणे जिल्ह्यात आगामी वर्षांत होऊ घातलेल्या महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी निर्दोष मतदार यादी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महापालिकांच्या समन्वयातून मतदार याद्या अद्ययावतीकरण आणि नवमतदार नोंदणी मोहिम यशस्वीपणे राबवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिली. दि.१ जानेवारी २०२२ जे वयाची १८ वर्ष पूर्ण करतील अशांना दि. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ याकालावधीत नवमतदार नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शैक्षणीक संस्थांची मदत घेतानाच जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन नार्वेकर यांनी केलेय.

राज्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी आज संयुक्तपणे सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी नार्वेकर बोलत होते.

८ लाख मतदारांचे छायाचित्र नाही
नार्वेकर यावेळी म्हणाले, ठाणे जिल्ह्यात आगामी काळात सहा महापालिका, २ अ वर्ग नगरपालिका, २ नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. त्यासाठी जिल्हा निवडणुक यंत्रणेला सर्व महापालिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जिल्ह्यात सुमारे ८ लाख मतदार असे आहेत ज्यांचे मतदार यादीत नाव आहे मात्र छायाचित्र नाही. त्यामुळे अशा मतदारांची चौकशी करून त्यांची नावे वगळण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत ३ लाख ६० हजार नावे यादीतून वगळण्यात आली असून बीएलओ कडून पंचनाम्यांची कार्यवाही सुरू आहे.

बीएलओंची भूमिका महत्वाची
या कामासाठी बीएलओंची भूमिका महत्वाची असून ज्यांची बीएलओ म्हणून नेमणूक झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना महापालिकांनी तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केली. ठाणे महापालिकेचे सीएफसी असलेल्या ठिकाणी मतदारांसाठी फॉर्मस् उपलब्ध करून देण्यात येतील, गृहनिर्माण संस्थांची देखील त्यासाठी मदत घेण्यात येईल. त्याप्रमाणे मतदार यांद्याच्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी आणि नवमतदार नोंदणीसाठी जनजागृती मोहिम हाती घेऊन जिल्ह्याच्या निर्दोष मतदार याद्या करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीनंतर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी तातडीने महापालिकेच्या उपायुक्तांची बैठक घेतली. दि. १ ऑक्टोबरपासून अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी मिशन मोडवर काम करावे. निर्दोष मतदार यादी आगामी निवडणुकासाठी महत्वाची असून सर्वांनी कामाला लागा, असे निर्देश नार्वेकर यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात असलेल्या १८ विधानसभा मतदार संघात प्रत्यक्ष भेटी देऊन बैठका घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा उप निवडणूक अधिकारी अर्चना कदम, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी येथील महापालिकांचे उपायुक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *