मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त,
पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम 3.50 रुपये स्वस्त
मुंबई, दि. 1 :- राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ११ मार्च रोजी महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करत, सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित कर कमी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यानुसारच सीएनजी आणि पीएनजी स्वस्त करण्यात आली आहे महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल, असे प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.