मोनोरेलचा दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू करा : कल्याण, ठाण्याच्याही प्रकल्पांचा मुख्यमंत्रयानी घेतला आढावा
मुंबई : मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आढावा घेतला. या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी, तसेच मोनोरेल चा दुसरा टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करावा. बीकेसीमधून हायब्रीड इ बसेस लवकरात लवकर सूरु करावे अशाही सुचना फडणवीस यांनी केल्या. तर कल्याण, ठाण्याची कामे प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प, मल्टीमोडल कॉरिडोर, रस्ते आणि उड्डाणपूल, एलिव्हेटेड रेल्वे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड इ. प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्रयानी बांद्रा कुर्ला संकुलातील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधांची कामे कालबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना केल्या. सर्वंकष तिकीट प्रणाली व्यवस्था वर्षाखेरीस सुरु करण्याविषयीची सूचना मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला दिली. त्याचबरोबर विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग प्रकल्पाला गती मिळण्याकरिता हा प्रकल्प वॉर रुमच्या कक्षेत घेऊन कामाचा वेग वाढवावा. कामे पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, असे त्यांनी सांगितले. अंधेरी [पूर्व] ते दहिसर [पूर्व] मेट्रो मार्ग-7 आणि दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्ग-2A ह्या दोन्ही मेट्रो मार्गिका वेळे आधीच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. प्राधिकरणाने इतरही मेट्रो मार्गांचे काम जलद गतीने सुरु करुन मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी,असेही मुख्यमंत्रयानी सांगितले.
कल्याण ठाण्याची कामे प्रगतीपथावर
कल्याण रिंग रोड, ठाणे ते विठावा स्कायवॉक, कल्याण भिवंडी उड्डाण पूल, कुरार सबवे, कल्याण अंबरनाथ उड्डाणपूल, मानकोली मोतगाव रस्त्यावर उड्डाणपूल आदी कामे वेगाने सुरू असल्याचे तसेच बाह्य रस्ते विकास योजनेतील कामेही प्रगतीपथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी मेट्रो, मोनोरेल, एम.टी.एच.एल., सूर्या पाणी पुरवठा प्रकल्प योजना, मल्टी मोडल कॉरीडोर, हायब्रीड बसेस, वडाळा मास्टर प्लॅन, कॉमन मोबिलीटी कार्ड, बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर, कलानगर जंक्शन येथील उड्डाणपूल, बीकेसी ते वाकोला उन्नत रस्ता, छेडा नगर जंक्शन उड्डाणपूल, कल्याण आणि भिवंडी विकास केंद्र इ. प्रकल्पांच्या कामांचे सादरीकरण केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकल्पाची माहितीही यावेळी देण्यात आली.