महाड : तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात पोहोचले भर पावसात मुख्यमंत्रयानी परिस्थितीची पाहणी केली. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.
अतिवृष्टी, पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळं रायगड जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे.महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४२ लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच मातीमोल झालं असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात पोहचून त्यांनी दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करीत ग्रामस्थांना धीर दिला. सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गावकऱ्यांनी काळजी करू नये अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्रयासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram, Twitter, Likdin आणि YouTube वर नक्की फॉलो करा )