मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे,  तेच त्यांच्या हिताचे 

शिवसेनेचा सामनातून प्रहार

मुंबई : मुंबई महान बनविण्यात परप्रांतियांचा वाटा आहे असे बेजबाबदार विधान मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्रयानी केलेले विधान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे असा प्रहार मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून केलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मनसेनंतर, आता शिवसेनाही आक्रमक बनल्याचे दिसून येतय.

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे असे उद्गगार काढले होते. मुख्यमंत्रयाच्या वक्तव्याचा समाचार घेत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्रयांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळू शकत नाही पण ‘भय्याभूषण’ पुरस्कार मिळावा, अशा शब्दात टिका केली होती. मुख्यमंत्रयाच्या विधानावर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही नाराजी प्रकट केलीय. सामनातील अग्रलेखातून मुख्यमंत्री आणि भाजपवर चांगलेच आसूड ओढलेत. मुंबई घडविणाऱ्या, रक्षणाऱ्या श्रमिकांच्या बाजूने फडणवीस बोलले नाहीत, तर ते श्रमिकांचे शोषण व लूट करणाऱयांच्या समर्थनार्थ बोलले आहेत. सध्या मात्र मुंबईचा विकास म्हणजे बिल्डर व धनिकांचे राज्य आणि त्याच पैशांतून शेठजींच्या पक्षांचे राजकारण, असा एकंदर प्रकार सुरू आहे. मुंबईचा विकास जर एवढ्यापुरताच मर्यादित असेल तर मुख्यमंत्र्यांचे विधान योग्यच व भाजपसारख्या पक्षाचा खरा चेहरा दाखविणारे आहे असेही खडे बोल सुनावलेत.

मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्कच नाकारला जातो. घाटकोपर रेल्वे स्थानकासमोरील चौकाचे ‘शिक्षणमहर्षी आय. डी. सिंह’ असे नामकरण झाले. घाटकोपरमध्ये श्री. सिंह यांनी हिंदी भाषिकांसाठी शिक्षण संस्था उत्तमरीत्या चालविल्या व त्यांचे स्मरण म्हणून एका चौकास त्यांचे नाव दिले. मुंबईत असे सामाजिक व शैक्षणिक योगदान देणाऱ्यांचे स्मरण नेहमीच ठेवले जाते. जात, धर्म व प्रांतापलीकडचा हा विषय आहे. राम मनोहर त्रिपाठी हे मुंबईतील हिंदी भाषिकांचे सगळ्यात लाडके व हिंदी भाषिकांना मुंबई-महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणारे नेते होते. त्रिपाठी हे राज्य सरकारात मंत्री होते. मुंबईतील त्यांचे सांस्कृतिक योगदानही मोठे आहे, पण त्रिपाठी हे मुंबईतील धनदांडग्या प्रवृत्तीचे नेतृत्व करीत नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. दुधात साखर मिसळावी तसे ते येथील संस्कृतीत मिसळून गेले होते व हिंदी समाजाने तेच करावे ही त्यांची भूमिका होती. प्रांतीय मतपेढीचे राजकारण त्यांनी किंवा आय. डी. सिंह यांच्यासारख्यांनी कधीच केले नाही. आज परप्रांतीय मतांच्या जोरावर भाजप मुंबईचे राजकारण करू पाहत आहे. त्यामुळे काँगेसचीच भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून गरळ ओकल्यासारखी बाहेर पडत आहे असा टोलाही अग्रलेखातून लगावलाय.

मुंबईच्या विकासाचा पाया घालणारे व शिखर बांधणारे मराठीच आहेत. मराठी माणसांबरोबर पारशी व दानशूर गुजराती उद्योगपती त्यात सहभागी होते. नाना जगन्नाथ शंकरशेठ हे तर आजच्या आधुनिक मुंबईचे जनक. डॉ. भाऊ दाजी लाड हेसुद्धा आहेत. सर जमशेटजी जिजीभाई, फ्रामजी कावसजी, वाडिया यांच्यासारखे अनेक दानशूर पारशी लोक त्यावेळी मुंबईचे वैभव वाढवीत होते. नाना शंकरशेठ यांनी आपल्या कर्तृत्वाने संपत्ती मिळविली आणि मुंबईचे जीवन संपन्न करण्यासाठी ती वापरली. शैक्षणिक कार्यात भाऊ दाजी लाड यांचे काम मोठे होते. या सगळ्यांनी स्वतःची संपत्ती मुंबईच्या विकासासाठी वापरली. कारण मुंबई म्हणजे त्यांच्यासाठी फक्त सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नव्हती. सध्या मात्र मुंबईचा विकास म्हणजे बिल्डर व धनिकांचे राज्य आणि त्याच पैशांतून शेठजींच्या पक्षांचे राजकारण, असा एकंदर प्रकार सुरू आहे. मुंबईचा विकास जर एवढ्यापुरताच मर्यादित असेल तर मुख्यमंत्र्यांचे विधान योग्यच व भाजपसारख्या पक्षाचा खरा चेहरा दाखविणारे आहे. मुंबईसाठी मरणारा स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू त्यांच्या खिजगणतीत नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून हुतात्मा झालेल्या १०५ लोकांचे त्यांना स्मरण नाही. येथील गिरण्यांच्या जमिनीवर आता मराठी माणसांची थडगी उभी राहिलेली दिसतात. त्या थडग्यांवर उपऱ्या धनदांडग्यांनी श्रीमंती मॉल्स व टॉवर्स उभे केले. त्या टॉवर्सकडे बघून मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. ‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे अस म्हटलय.

————

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *