अन्नसुरक्षा विषयक व्यापक चर्चा : दावोस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये उपस्थिती

मुंबई (अजय निक्ते) : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०१८ मध्ये उपस्थित राहण्यासाठी दावोस येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली भेट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी क्लिन यांच्यासोबत झाली.  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भारतातील शेतकरी बांधवांसाठी व्हॅल्यूचेन, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर यावेळी फडणवीस यांनी सीन डी क्लीन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. २५ लाख शेतकर्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागिदारीतून व्हॅल्यूचेनला अधिक चालना देणे, ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागिदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा असेही अनेक विषय या चर्चेत होते. अन्न सुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक चांगली वाटचाल करण्यासह ही चर्चा निश्चितपणे उपयोगी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवाय, जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोरमचे आभार व्यक्त केले. विविध तज्ञांचा सहभाग, ज्ञानाचे आदानप्रदान आणि सहकार्यातून विज्ञान-तंत्रज्ञान आधारित धोरणांची अंमलबजावणी अधिक सुकर होणार आहे. या केंद्राचा रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसेच शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राचा अधिक अवलंब यावर अधिक भर असेल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!