मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर प्रथमच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह ९ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी शिंदे हे प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे शिंदे यांचा दौरा विशेष मानला जात आहे. 

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे अयौध्या दौऱ्यावर जात असल्याने   शिवसेना शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वेही बुक करण्यात आल्या आहेत. 

अयोध्या दौऱ्याआधी एक टिझर..

शिवसेना ( शिंदे गट ) प्रवक्ते नरेश मस्के यांनी अयोध्या दौऱ्याआधी एक टिझर ट्विट केला आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बॅनरवर दिसत आहेत. तसेच, प्रभू श्री रामाचे अयोध्येतील नवीन मंदिरही दाखवण्यात आलं आहे.शिंदे हे अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहे.  शरयू नदीवर महाआरती करणार आहेत, तसेच साधू, संत आणि महंतांकडून “शिवधनुष्य स्विकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

उत्तरप्रदेश मध्ये महाराष्ट्र सदन ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेश येथे महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर प्रदेश मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्या मागणीला आदित्यनाथ यांनी होकारही दर्शविला आहे. त्यामुळे आयोध्या  दौऱ्यात शिंदे हे योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदन उभारण्याबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रातील सांस्कृतिक रूढी, परंपरेचे दर्शन घडणार आहे. मात्र हे महाराष्ट्र सदन कशा स्वरूपाचे असेल, त्यामध्ये रहण्यापासून, महाराष्ट्रीयन जेवणापर्यंत काय काय सुविधा असतील, याबाबत शासन पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. एकंदरच महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान लाभले, त्यांचा इतिहास, कला, संस्कृती आदीचे दर्शन घडणार आहे. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र सदन उभारण्याचा प्रयत्न असल्याचे समजते.

—–+—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!