मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!
भाईंदर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर प्रवासात थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्री गुरूवारी भाईंदरमध्ये एका उद्घाटन कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी ही घटना घडली. भाईंदर येथील एका शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्र्यांच हेलिकॉप्टर उतरणार होतं. हेलिकॉप्टर खाली उतरत असताना पायलटला लोंबकळत असणारी केबल दिसली. त्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर खाली न उतरवता पुन्हा वर नेले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही केबल हेलिकॉप्टरच्या पंखात अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.
9 महिन्यातील चौथी घटना
मुख्यमंत्री हेलिकॉप्टर प्रवासातून थोडक्यात बचावण्याची ही गेल्या 9 महिन्यातील चौथी घटना आहे. 25 मे रोजी लातूर दौऱ्यावर असताना निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या पात्यांचा वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ते कोसळले. 7 जुलै रोजी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसताना गडबड झाल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. त्यानंतर 9 डिसेंबरला नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने ते उतरवावे लागले होते आणि आजची भाईंदरमधील ही चौथी घटना आहे.