मुंबईतील हुक्का पार्लर विरोधात महापौरांनी दंड थोपटले
मुंबई : काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथे हुक्का पार्लरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खून आणि हुक्का पार्लरकडे आकर्षित होणारी तरुनपिढी या पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी हुक्का पार्लर विरोधात दंड थोपटलेत. मुंबईतील हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद करावीत अशी मागणी महापौरानीआज मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन केली.
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू आहेत. याकडे तरुण पिढी आकर्षित होऊन मादक आणि अमली पदर्थ्यांच्या अधीन जात आहेत. त्यामुळे स्वतःवरील नियंत्रण हरवून बसत आहेत असे महापौरांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय. तंबाखूवर बंदी असतानाही ही उत्पादने शाळा आणि महाविद्यालय परिसरात राजरोसपणे विकली जातात. हुक्का पार्लरही शाळा -महाविद्यालय परिसरात आढळून येतात याकडेही महापौरांनी लक्ष वेधून, सामाजिक सुरक्षतेचा प्रश्न म्हणून महापालिका आणि पोलिस यंत्रणा यांनी समन्वयाने हुक्का पार्लरवर प्रतिबंध घालावा अशी मागणी महापौरांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केलीय. महापौरांच्या मागणीनंतर हुक्का पार्लर विरोधात पोलीस काय कारवाई करतात याकडं लक्ष वेधलय.