डोंबिवली : ठाणे भिवंडी मार्गावरील कशेळी टोलनाका मनसैनिकांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच, आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-शीळ रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी केली आहे. आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांना पत्र दिले आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, कल्याण-शिळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्यावर मौजे काटई येथे टोल आकारणी सुरु होती.परंतु सध्या एम.एस.आर.डी.सी. कडून या २१ कि.मी. रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरु असून या रस्त्यासाठी १९८ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. रस्त्याचे काम सुरु असल्याने टोल आकारणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. मौजे काटई येथील टोलनाका आता कायमस्वरुपी बंद करावा अशी मागणी होत आहे. कारण १९८ कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी प्रवाशांना भविष्यात टोलचा भुर्दंड लावणे योग्य नाही. महाराष्ट्रात आधीच बऱ्याच ठिकाणी टोलनाके सुरु आहेत. त्यामध्ये अशाप्रकारच्या कमी खर्चाच्या रस्त्यावर टोल आकारणी करणे योग्य होणार नाही. त्यामुळे कल्याण-शिळ रस्त्यासाठी मंजूर असलेल्या निधीची शासनाकडून पुर्तता करुन कायमस्वरुपी टोल बंद करावा याकडे आमदार पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे .