कोपर गावात विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
डोंबिवली : कोपर गावातील ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळ ( संचालित ) सरकार मान्य चरू भामा म्हात्रे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देणारे चित्रे काढली. या रॅलीत अध्यक्ष तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ओला कचरा – सुका कचरा यांचे वर्गीकरण करावे, रस्त्यावर कचरा टाकू नका, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका.. रस्त्यावर थुंकू नका असे सांगत शाळेपासून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत ग्लोबल महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले की, देशभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. कोपर गाव येथील चरू भामा म्हात्रे विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी जनजागृती रॅली काढली होती. प्लास्टिक पिश्व्यामुळे पर्यावरणाची हानी होत असते.म्हणून कागदी आणि कापडी पिशवी वापर केला पाहिजे. पालिकेने रुजवू संस्कृती स्वच्छतेची असा संदेश देणारी कापडी पिशवी विद्यार्थ्यांना दिली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनच्यावतीने स्वच्छता अभियान
संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनच्या वतीने स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरु करण्यात आले आहे.सद्गुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त देशभरातील २५० शहरांमधील ५६४ सरकारी रुग्णालयाचा परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी व कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. शनिवारी सकाळी संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात प्राथना करून स्वच्छता अभियानास सुरुवात केली. विशेष म्हणजे या अभियानात लहान मुलेही सहभागी झाले होते. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचे पाहून नागरिकांनी कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले देवाच्या सेवेबरोबर मानवाची सेवा महत्वाची हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्याच्या या समाजकार्यात माझे संपूर्ण सहकार्य आहे. त्यांच्या विचाराना आणि प्रयत्नांना मी धन्यवाद करतो. यामुळे देश बदलण्यास वेळ लागणार नाही.या अभियानामुळे रुग्णालयाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. यापूर्वी संत निरंकारी चॅरीटेबल फांडेशनच्या वतीने काही शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अश्या प्रकारची मोहीम राबविण्यात आली होती.