ठाणे : दिवाळी अर्थात दीपोत्सवाला जसे घरात व घराबाहेर पणत्या, दिवे, आकाशकंदिल लावतात तसेच अनेक मराठी घरात दिवाळीसाठी बनवलेला फराळ देवळांमध्ये प्रसाद दाखविल्याशिवाय खाल्ला जात नाही. छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याच्या हेतूने भारतभर महाराजांच्या स्मारकस्थळांवर दिवाळीत असंख्य शिवप्रेमी स्वयंस्फुर्तीने दीप प्रज्वलन करतात. परंतु पणत्यांमधून सांडलेले तेल, मेणबत्यांचे ओघळ, दिव्यांची काजळी दीपोत्सवानंतरही तशीच राहते. त्यामुळे ठाण्यातील मासुंदा तलाव येथील शिवस्मारकाची शिवप्रेमींकडून स्वच्छता करण्यात आली.
ठाण्यात मासुंदा तलावावर उभारलेल्या शिवस्मारकाभोवतीही महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दिवाळीत नेत्रदीपक रोषणाई अनेक संघटनांकडून दर वर्षी केली जाते. नागरिक उत्साहाने दीपोत्सव साजरा करतात परंतु पणत्यांमधून सांडलेले तेल, मेणबत्यांचे ओघळ, दिव्यांची काजळी दीपोत्सवानंतरही तशीच राहते. त्यामुळे ठाण्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले शिवप्रेमी संजय जाधव यांना ही गोष्ट खटकली व त्यांनी शिवस्मारक येथे दिवाळीपूर्व स्वच्छता मोहीम घेण्याचे ठरवले. मराठा जागृती मंच पानिपत, ठाणे विभाग यांचे शिवप्रेमी मावळे त्यांच्या हाकेला लगेचच धावून आले व एक आगळीवेगळी स्वच्छता मोहीम आखली गेली.
शिवस्मारक हे ठाण्यातील इतिहासप्रसिद्ध मासुंदा तलावावर स्थित असल्याने, अत्यंत काळजीपूर्वक हि मोहीम राबविली गेली. तलाव व परिसरातील पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचू नये यासाठी निसर्गपूरक साहित्य वापरून स्वच्छता केली गेली. ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक सुमंत जमेनीस व श्री कल्पेश पाटील यांनी निसर्गपूरक स्वच्छता साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.