डोंबिवली, २ मार्च: महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी पूर्तीनिमित्त पद्मश्री व महाराष्ट्र भूषण सन्मानित डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
डोंबिवली दिवा आणि मुंब्रा भागात राबविण्यात आलेल्या या महास्वच्छता अभियानात 5198 श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन 66.80 टन इतका ओला-सुका कचरा उचलून त्याची विल्हेवाटही लावली.
श्रीसदस्यांनी एकूण 172 किलोमीटर रस्त्यांची सफाई केली. या अभियानासाठी महापालिकांच्या वाहनांव्यतिक्त बैठकीच्या माध्यमातून 7 तीन चाकी टेंपो, 6 चार चाकी टेंपो, 6 डंपर व 4 जेसीबी वाहनांचा वापर करण्यात आला. हे महास्वच्छता अभियान फक्त डोंबिवली विभागापुरतेच नसून संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधूनही पार पडले.
मानवी आरोग्यासाठी जशी शुद्ध हवा, शुद्ध पाणी आवश्यक असते तसेच स्वच्छ परीसरही आवश्यक आहे. याची जाणीव सर्वसामान्यांना होणे, तसेच अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे आजार व साथीचे रोग पसरतात व त्यासाठी औषधोपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च करणे भाग पडते.
काही वेळेस जीवीतहानी सुद्धा होते. या पार्श्वभूमीवर जनजागृती करून सार्वजनिक स्वच्छता ही किती महत्त्वाची आहे, याचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.