ठाणे /प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने येऊर येथील स्थानिक आदिवासी व येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी तर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. येऊर येथे अनेक अनधिकृत धाबे, हॉटेल्स, बंगले, फार्म हाऊस जंगलक्षेत्राला खेटून उभी आहेत. शहरी पर्यटकांचा येथे वर्षभर मौमजेसाठी राबता असतो. त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता तो इतस्ततः फेकून दिल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात लहानसहान ओढ्यांमार्फत तो जंगलाच्या मध्यवर्ती भागात वाहून जातो. यामुळे जंगलक्षेत्रात प्रचंड प्रदूषण होते व त्याचा विपरीत परिणाम इथल्या अधिवासावर होत असतो.
याकरिता गेले ६ वर्ष येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे पावसाळ्यादसरम्यान स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते. यावर्षी कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जंगलक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींनी स्वयंस्फूर्तीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पर्यावरण अबाधित राहावे याकरिता राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यक्रमाला कात्री लावत स्वच्छता मोहीम राबविली. या निमित्ताने हॉटेलचालक तसेच पर्यटकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जंगलक्षेत्रात स्वच्छतेचे नियम पाळून नैसर्गिक अधिवास प्रदुषित न करण्याचे आवाहन स्थानिक आदिवासी किशोर म्हात्रे, रमेश वळवी यांच्यातर्फे करण्यात आले.
*****