डोंबिवली : आयरे गावातील गावदेवी मंदिरात शुक्रवारी रात्री देवीच्या दर्शनासाठी आलेल्या स्थानिकांना त्याच भागातील १५ जणांनी दगडांचा मारा करत धारदार हत्यारांचे वार करत गंभीर जखमी केले. पूर्व वैमनस्यातून हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी १५ पैकी आतापर्यंत अवघ्या २ जणांना ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्यात ओंकार श्रीराम भगत (२७) आणि त्याचे मित्र व एक महिला असे गंभीर जखमी झाले आहेत. ओंकारच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचीन केणे, नरेंद्र जाधव, गौरव जुळवे, अखिलेश धुळप, वरूण शेट्टी, योगेश सुर्वे, नितीन यादव, गौरव फडके आणि इतर १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक नेत्या-पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने होणारा गंभीर प्रकार टळला.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आणि प्रतिस्पर्धी गटात पूर्ववैमनस्यातून काही वाद आहेत. त्यांच्यात या विषयावरून नेहमी धुसफूस सुरू असते. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता नवरात्रोत्सव असल्याने ओंकार आपल्या मित्रांसह आयरे गावातील गावदेवी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी तेथे सचीन केणे आणि इतर १५ जण धारदार शस्त्रे घेऊन जणू वाट पाहत उभे होते. ओंकारला पाहताच त्यांनी ओकांरशी भांडण उकरून काढून मारहाण सुरू केली. ओंकारचे मित्र वाद मिटविण्यासाठी पुढे आले तर त्यांनाही दगडीचा मारा, धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करण्यात करण्यात आले. हा प्रकार पाहून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांसह महिला, लहान मुलांची पळापळ झाली.
स्थानिक नेत्या-पुढाऱ्यांनी या दोन्ही गटांना थोपवून धरले म्हणून पुढील घटना टळली. ही माहिती रामनगर पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप अधिक तपास करत आहेत.