डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी मधील मिलापनगर/सुदर्शन नगर परिसरातील रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नागरिकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धडक देऊन पाणी पुरवठा अधिका-यांना जाब विचारला. जर पाणी पुरवठयात सुधारणा न झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला. याप्रसंगी एमआयडीसी पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंता विजय धामापुरकर यांना रहिवाशांच्या सह्यानिशी मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले. एमआयडीसी कडून विजय धामापुरकर यांनी पाणी पुरवठा बाबतीत ताबडतोब सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे. याप्रसंगी मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्षा वर्षा महाडिक, अरुण जोशी, आनंद दामले, राजु नलावडे, मुकुंद देव, विश्राम परांजपे, मिलिंद जोशी, संजय चव्हाण, सचिन माने, अविनाश दुसाने, संजय वणी, वनिता कोरगांवकर, महेश साठम, संजय मोघे, निवृत्ती गावकर, समीर गोखले, शिल्पा भोर, राजश्री देशमुख, राजेंद्र नांदेडकर इत्यादी ५५ महिला पुरुष रहिवासी उपस्थित होते.