ठाणे – ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22 या आर्थिक वर्षात जे घरगुती नळ संयोजनधारक आपले थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित जमा करतील अशा घरगुती पाणी बिलधारकांना त्यांच्या थकीत पाणी बिलावर आकारण्यांत आलेल्या प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सवलत देण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपली पाणीपट्टी भरावी असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील जे घरगुती नळसंयोजनधारक 1 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा घरगुती संयोजन धारकांना त्यांच्या थकीत पाणीबिलावर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती संयोजनधारकांनी पाणीपट्टी जमा केली असेल, अशा घरगुती नळसंयोजनधारकांना ही योजना लागू राहणार आहे.
कोरोना काळामध्ये नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या असून अनेकांचे रोजगार व उद्योग बंद झाले आहेत, यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत आहेत, अशा नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेने महत्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
तसेच ज्या नागरिकांनी अनधिकृत नळसंयोजन घेतले आहे अशांनी विहित नमुन्यातील अर्ज ते राहत असलेल्या वास्तव्याचा कागदोपत्री पुरावा उदा. करआकारणी देयक, विद्युत बिल, शिधापत्रिका, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधारकार्ड अशा प्रकारचे पुरावे सादर करावेत व आपले अनधिकृत संयोजन नियमित करुन घ्यावे असेही आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. नागरिकांना पाणीपट्टी बिलाची देयके ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयात तसेच महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.