महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी या विमानतळाचे लोकार्पण झाले. समस्त कोकणवासियांसाठी निश्चितच आनंदाची, अभिमानाची आणि महत्वाची सोईची व विकासाची नवी वाट निर्माण झाली.
आपण अगदी लहान घर म्हणा की साधा फ्लॅट, टाॅवरमधील फ्लॅट, डुप्लेक्स, बंगला अगदी सेकंड होम जरी घेतले तरी त्याची जमेल तशी वास्तूशांत करतो. आप्तेष्टांना बोलावतो, आपल्या वास्तूची माहीती देतो , त्यामागील कष्ट आणि मदत करणार्यांविषयी कृतज्ञतेचे चार शब्द बोलतो. वडीलधार्यांकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकून कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आणि आनंदात वास्तूशांत व सोहळा संपन्न झाला म्हणून आनंद मानतो. आणि आज करोडो रूपये खर्च करून आमच्याच टॅक्समधील काही भाग वापरून आपण लोकार्पण सोहळा (? ) केला त्यावेळेस आपण, यजमान म्हणून, आणि आपण आलेले पाहुणे म्हणून आपल्याच राज्याच्या (घरच्या) आणि आप्तेष्टांच्या समोर इतक्या पवित्र मंगलमयी प्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढण्यात धन्यता मानली आणि इतक्या मोठ्या महत्त्वाच्या लोकार्पण सोहळ्यात ( आमच्या दृष्टिकोनातून पवित्र अशा वास्तूशांती) प्रसंगी जे वागलात आणि शब्दांचे बाण आणि विचारांचे प्रहार, तसेच श्रेय्यवाद यावर जाहीर रित्या जे मौखिक वाकयुध्द केले ते मुळीच समर्थनीय, शोभनीय नव्हते. तुमच्या स्वतःच्या वास्तूच्या वास्तूशांत प्रसंगी असे वर्तन केले असते का ? याचं उत्तर निश्चितच नाही किंबहुना असं कोणी करत नाही. मग आमच्या चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात असे आपले मौखिक शक्तिप्रदर्शन का केले ? तो जनतेचा पैसा होता म्हणून ? आपण आजी आणि ते माजी असून देखील एक जबाबदार म्हणून संयम आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून वागू शकला असता ! पण आपण असे केले नाही. इतिहासात लोकार्पण सोहळ्यातील आपल्या मौखिक वाकयुध्दाची निश्चितच नोंद केली जाईल. विमानतळाची वास्तू आमच्या पैशातून बांधली गेली आणि त्यामागील आमच्या भावना आणि आदर याचा विचार व्हायलाच पाहीजे होता हे कदापि विसरून चालणार नाही. आपण आज राज्यकर्ते आहात उद्या नसणार परंतु विमानतळ ही आमची व देशाची संपत्ती आहे हे विसरून चालणार नाही.
श्रीकांत जोशी, डोंबिवली