ठाणे दि. 26 :- लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्‍याच्‍या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्‍थापन करण्‍यात आले आहे. सर्वसामान्‍य जनतेचे दैनंदिन प्रश्‍न, शासन स्‍तरावर असलेली कामे व त्‍यासंदर्भात प्राप्‍त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्‍यादीवर या कक्षामार्फत कार्यवाही करण्‍यात येणार आहे.

याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. राज्‍यातील सर्वसामान्‍य जनतेचे दैनंदिन प्रश्‍न, शासनस्‍तरावर असलेली कामे यासंदर्भात वेळोवेळी निवेदने / अर्ज प्राप्त होतात. त्याअनुषंगाने प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्‍यासाठी प्रत्‍येक जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हाधिकारी कार्यालयामध्‍ये मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्‍ह्यातील उपलब्‍ध असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍यामधून आवश्‍यक अधिकारी, कर्मचारी यांच्‍या सेवा या मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्‍ध करुन देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी हे या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी आहेत. त्याशिवाय एक नायब तहसिलदार व एक अव्वल कारकून व एक लिपिक टंकलेखक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा शहरी आणि ग्रामीण, दुर्गम, डोंगरी अशा भागात विभागला आहे. ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील नागरिकांचे शेती, नागरी, विकास कामांच्या समस्यासंदर्भातील प्रश्न, तक्रारींचा निपटारा झटपट होण्यासाठी या कक्षामुळे मदत होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व डोंगरी भागातील नागरिक हे पहाटे निघून मंत्रालयात कामासाठी जात असतात. अशा नागरिकांचे प्रश्न गतिमानतेने, पारदर्शकपणे व विनाविलंब जिल्हास्तरावरच मार्गी लागावे, यासाठी ठाणे जिल्ह्यात क्षेत्रिय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जिल्‍हास्‍तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित असलेल्या अर्ज व निवेदन अशी प्रकरणे जिल्‍हा स्‍तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्‍यावर तातडीने कार्यवाही शासन स्तरावरील निर्देशान्वये करण्याच्या सुचना संबंधीत कक्षास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

ठाणे जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून प्राप्त होणारे अर्ज, निवदने व संदर्भ स्विकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जांची पोचपावती संबंधितांना देण्यात येणार असून हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यावर केलेल्या कार्यवाहीचा मासिक आढावाही शासनाला सादर करण्यात येणार आहे, असे कक्षाचे विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!