मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
जवाहर बालभवन येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते. या अभियानासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा – 2 या उपक्रमांचा शुभारंभ देखील ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमात राजभवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना मंत्री केसरकर म्हणाले, उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असणार आहेत. तर उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री धनजंय मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अ व ब वर्गाच्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा अशा स्तरांवर राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात विभाग व राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. या अभियानातून 2 कोटी मुलांपर्यंत पोहचण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सर्व स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा
राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना जे ज्ञान मिळणे गरजेचे आहे, ते सुद्धा दिले गेले पाहिजे, अशा पद्धतीने अभ्यासक्रम बनविण्यात यावा. सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्व शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. केसरकर म्हणाले, शालेय शिक्षण विभागाने बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेबरोबर करार केला आहे. अभ्यासक्रम बनवितांना बालमनाचा अभ्यास करण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यावी. बाल मानसोपचार तज्ज्ञ यांचेही मार्गदर्शन घ्यावे. मुलांवर अभ्यासाचे दडपण येणार नाही, याची काळजी घ्यावी. याबाबत तज्ज्ञांचे पॅनल तयार करावे. त्यांचे मत जाणून घेऊन अभ्यासक्रम बनवावा. पॅनलमध्ये बाल मानसोपचार तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ, सीबीएससी शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ, बोर्डाच्या शाळा अभ्यासक्रमातील तज्ज्ञ यांचा समावेश असावा. पॅनलवरील तज्ज्ञांचा अहवाल घ्यावा. या अभ्यासक्रमात बोली भाषा व मराठीची सांगड घालावी.