डोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या सूतिकागृहासह अत्याधुनिक अशा कॅन्सर रुग्णालयाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले. यासोबतच डोंबिवलीतील विविध विकासकामांचेही मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पणही संपन्न झाले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा…

गेले काही वर्ष वापराविना पडून असलेल्या या इमारतीच्या जागेवर कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरु होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हेदेखील या रूग्णालयाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ठाणे जिल्ह्याला लवकरच एक सुस्सज असे कर्करोग रुग्णालय मिळणार आहे.

असे असणार हे सूतिकागृह आणि रुग्णालय…

नवीन बांधण्यात येणारे सुसज्ज असे कॅन्सर आणि प्रसुती रुग्णालय हे तळ +8 मजली असून त्यामध्ये 150 बेड्स असणार आहेत. यापैकी 100 बेड्स कर्करोगग्रस्त आणि 50 बेड्सचे प्रसुतीगृहासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सुतिकागृहामध्ये प्रसूतीविषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. सुसज्ज कर्करोग रुग्णालयामुळे मुंबई, ठाण्याएवजी आता महानगरपालिका क्षेत्रातच उपचार मिळणे शक्य होणार आहे. या कर्करोग रुग्णालयामध्ये रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया आदी कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. तर इतर रुग्णांना CGHS (Central Government Health Scheme) दराने सेवा उपलब्ध होणार आहेत.

या कामांचेही झाले भूमीपूजन- लोकार्पण…

अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय आणि सूतिकागृहासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, अद्ययावत फिश मार्केटचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन करण्यात आले. तर सुनिल नगर येथील सुसज्ज अभ्यासिका, शास्त्रीनगर रुग्णालयातील 10 बेडचे एनआयसीयू आणि शवविच्छेदन केंद्र आदी विकासकामांचेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकार्पण केले.

खासदार डॉक्टर लाभल्यानेच मतदारसंघात अनेक आरोग्य सुविधा बळकट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या मतदारसंघाला डॉक्टर खासदार लाभलेला असल्यानेच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात 400 हून अधिक खासदार निवडून येतील आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!