मुंबई, दि. १८: मुंबईतील सुमारे २२०० कीमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. तसेच जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा सन्मान केला जाईल, कर्तव्यात जे कसूर करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला
पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला. दुपारी तीनला भर उन्हात सुरू झालेला हा पाहणी दौरा सायंकाळी सहाच्या सुमारास वरळी येथे संपला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो यावर्षी करावा लागू नये करिता नाले सफाई चांगली झाली पाहिजे, नाल्यांचे खोलीकरण मोठ्या प्रमाणावर करा, असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा नाल्यांचे खोलीकरण कठीण खडक लागेपर्यत करा, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. .
नाल्यांचे खोलीकरण झाल्यावर त्यांची वहन क्षमता वाढेल. त्याच बरोबर ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते त्यांची माहिती अधिकाऱ्यांना असते त्यामुळे अशा जागी नोडल अधिकारी नेमून कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने काम करुन घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. वरळी येथील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राच्या ठिकाणी नाल्यांना फ्लड गेट लावण्यात आले आहेत. जेणेकरून भरतीच्यावेळी समुद्रातील पाणी नाल्यांमध्ये शिरणार नाही. अशाचप्रकारे फ्लड गेट आणि वेगाने पावसाचे पाणी समुद्रात फेकणाऱ्या पंपाची संख्या वाढवावी असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे हद्दीतील नाल्यांची देखील चांगल्या पद्धतीने सफाई झाल्यास रेल्वेरुळांवर पाणी साचणार नाही. याची देखील दक्षता घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले.
वांद्रे (पूर्व) परिसरातील मिठी नदी येथून त्यांच्या पाहणी दौऱ्यास सुरूवात झाली. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील भारत नगर येथे वाकोला नदीची पाहणी केली. त्या पाठोपाठ दादर मधील प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकीचे बांधकाम, वरळीतील लव्हग्रोव उदंचन केंद्र या ठिकाणी भेट देवून नालेसफाई तसेच पावसाळ्यात पाणी साचणार यासाठीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त आय. ए. चहल, अतिरीक्त आयुक्त पी. वेलारासु, आशीष शर्मा, महापालिका उपायुक्त, मुख्य अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.
००००