मुंबई : राज्यभरात होळीचा उत्साह आहे. तर कोकणात देखील शिमगोत्सवाची जोरदार तयारी असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील होळाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी होळी पेटवण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिकामातेला मनोभावे वंदन केले. तसेच होळी पेटवून समाजातील वाईट गोष्टींचा नाश कर आणि सर्वांना सुखी समाधानी ठेव एवढेच मागणे होलिकामातेकडे मागितले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
वर्षावर होळी साजरी झाल्यानंतर शिंदे यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर तसेच किसन नगर नंबर- २ येथे सहकुटुंब उपस्थित राहून होळी उत्सव साजरा केला. यावेळी दरवर्षीप्रमाणे किसन नगर नंबर-२ येथील होळीचे प्रथेप्रमाणे सहकुटुंब पूजन करून त्यानंतर होलिकामातेचे दहन केले.