ठाणे, अविनाश उबाळे : इयत्ता १०वी च्या परीक्षांना अवघे काही दिवस राहिले असून सर्व विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात केलेली आहे. १० वी बोर्ड हा उच्च शिक्षणासाठी जाण्याचा महत्वाचा टप्पा, त्यामुळे त्याचे गांभीर्य देखील तितकेच ! प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कसे असेल, कोणत्या धड्यांना किती महत्व असेल, वेळेत पेपर पूर्ण होईल कि नाही, एवढा अभ्यास कसा पूर्ण होईल अशा अनेक शंका विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात आहेत.याच सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आणि उत्कृट रित्या १० वी बोर्डाची तयारी कशी करावी यासाठी ‘रियल अकॅडमी’ कडून ‘बोर्ड मॉडरेटर सेशन’ चे आयोजन रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी व. व. भोपतराव सभागृह, शहापूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून १०वी महाराष्ट्र बोर्डातील मुंबई विभागाचे चीफ मॉडरेटर व महाराष्ट्र राज्य शासनाचे “आदर्श शिक्षक” पुरस्कार प्राप्त विलास परब (बालमोहन विद्यामंदिर, दादर) उपस्थित होते.
विलास परब सरांनी मुलांना विविध विषयांबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. सर्व विषयांमधील प्रत्येक धड्यांचे महत्व, त्यासाठी करावयाची योग्य तयारी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा हे वेळेचे नियोजन, शेवटच्या काही दिवसात अभ्यास पूर्ण व्हावा म्हणून काही युक्त्या,नीट नेटकी उत्तर पत्रिका कशी असावे याचे विश्लेषण, आणि पेपर तपासताना तपासणाऱ्या शिक्षकांचा दृष्टिकोन अशा सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. एकूणच कार्यक्रमाशेवटी शहापूर तालुक्यातून उपस्थित असलेले ४०० हुन अधिक विद्यार्थी आणि पालक हे समाधानाने घरी परतले.रियल अकॅडमीच्या वतीने संचालक अमोल पोतदार सर,तसेच उमेश राजपूत वैशाली बहाडकर आणि शहापूर, वासिंद व किन्हवली शाखेचे सर्व सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. यश वझे यांनी उत्तम रित्या पार पाडले.