मुंबई : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यात यश मिळवलयं. कर्नाटकातील पराभवानंतर   भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. महाराष्ट्रातही पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेातील असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून शपथविधीचं ठिकाणही सांगून टाकलं. त्यामुळे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ​काय होणार​  ? असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

भंडाऱ्यात भाजपाच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे संकल्प मांडले. बावनकुळे म्हणाले, आजच्या मेळाव्यात आपण पहिला संकल्प करायचा आहे की येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच मे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार त्यांच्या समर्थनात असायला हवेत. त्यातला भंडाऱ्याचा खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता हात वर करून उभा असला पाहिजे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आपला अजून एक संकल्प आहे. पुढच्या वर्षी, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईल. त्यानंतर ३० नोव्हेंबरच्या आत राज्यात नवीन सरकार बनेल. २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी राज्यात नवीन सरकार येईल. या नवीन सरकारसाठी पुन्हा एकदा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर… ऐकलं का सर्वांनी? यापूर्वी वानखेडेवर कोणाचा शपथविधी झाला होता? सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही हात वर करून सांगा तुमच्या मनात काय आहे? या महाराष्ट्रात पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर…देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली पाहिजे.” दरम्यान, बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांकडून अनेकदा या वाक्याची उजळणी करून घेतली.मात्र बावनकुळेंच्या शिंदे गटात नाराजी आहे.

आगामी वर्ष हे निवडणुकांचं असणार आहे.अवघ्या चार महिन्यात लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्यात जागा वाटपाबाबतही चर्चा सुरू आहे.मात्र तीन राज्यात मिळालेल्या यशामुळे जागा वाटपात भाजपची ताकद वाढणार आहे.त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात शिंदे आणि पवारांपेक्षा भाजपचं महत्व अधिक राहणार आहे हे स्पष्ट होत आहे.

 राज्यात ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार असतानाही गेल्या वर्षभरापासून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारची गाडी सुरू आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सत्तेवर आली.त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपसोबत दोन मित्र पक्ष आहेत.मात्र तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.त्यामुळे मित्र पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आहेत तर अजित पवारांसोबत  १ खासदार आहे.त्यामुळे शिंदे आणि पवार लोकसभेसाठी किती आणि कोणत्या जागा मागतात हे सुध्दा महत्वाचं आहे आणि भाजप मित्रपक्षांसाठी किती जागा सेाडणार हा सुध्दा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांवर आणि त्यांच्या पक्षातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांतील दोन्ही गटांची सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभेत कायेदशीर सुनावणी सुरू आहे.

 २०२४ ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जाईल असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे  यांच्याकडून यापूर्वी सांगण्यात आलं आहे.पण २०२४ ला फडणवीस मुख्यमंत्री हेातील या भंडा-यातील विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर शिंदे गटात नाराजीचा सूर आहे.  ​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *