मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याला प्रतिउत्तर दिलय. उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्याच दिवशी शिमगा करुन टाकला, असं पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी फक्त भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. पण राज्यातील महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते काहीच बोलले नाहीत, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
“महाराष्ट्रातील महिला अत्याचार वाढत चालले आहेत त्यामध्ये नेमकं काय करणार आहेत? कायदा पेंडिंग आहे. दिशा कायदा लवकर करुन टाका. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरु आहे. त्यावर तुम्ही काय करणार आहात? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केलाय.
“महाराष्ट्रात दोन वादळ आले, अतिवृष्टी झाली, महिलांवर अत्याचार झाला. मोठ्या प्रमाणात समोर येणारं ड्रग्ज प्रकरण, त्याबाबतही चिमूटभर गांजा तुम्ही म्हणत आहात. याचा अर्थ गांभीर्यच नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांना कदाचित लवकर शिमगा आला असं वाटल्याने आज जेवढा म्हणून केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा शिमगा त्यांनी केला”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.