जळगाव, २३ एप्रिल : भाजप हे आव्हान नाही, पण ते सत्तेवर आहेत, त्या दरम्यान जे नुकसान होईल ते दूर कसे करायचे ते आव्हान आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते पाचोरा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
मतदारांच्या डोळ्यात धूळफेक सुरू
ठाकरे म्हणाले की, राजा निवडायचा हक्क तुमचा. पण तुमच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान महागाईवर बोलायचे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालंय म्हणतात. हे खरं असेल तर हात वर करुन सांगा. निवडणूक आली की अबकी बार आता यांना आपटा.
अनेक घुशी बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या
सभेत सगळा जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची? हे दिसतयं. पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय का असं वाटतंय. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असून सर्व काही बघतोय. काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अश्या अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या. महाराष्ट्र गद्दारांचा नाही वीरांचा आहे. दोन्ही हात वर करुन वज्रमूठ दाखवा. वाट बघत होतो घुसणारे कधी घुसतायंत. मी राज्यभर येणार आहे. तुमच्यावर पुढील निवडणुकीची जबाबदारी आहे. महाराष्ट्र पिंजून काढणार गद्दारांची विल्हेवाट. दिवसा सूर्य आग ओकत असतो पण तुमची जी डोकी आहे ती तापली पाहिजेत. मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात. आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे. निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच आहेत.
आताचे सरकारच अवकाळी
आपले सरकार होत तेव्हा कोरोनाचे जागतिक संकट होते. नैसर्गिक संकटात आपण सरकार असतांना मदत केली. आता सरकारच अवकाळी, यांनी एकाही संकटात मदत केली नाही मग हे बोलावेच लागणार. आईच्या कुशीवर वार करणारी गद्दारांची अवलाद आपली नाही. काही लोक बाप बदलतात आणि बाप चोरतात. तुमच्या मेहनतीचे रक्त पिणारे हे गद्दार आहेत त्यांना मारायला तोफ नको. आज माझ्याकडे काही नाही पण तुम्ही आशीर्वाद देणारे हात माझ्या सोबत त्यांनी येऊन दाखवावे.
ईडी, सीबीआय मागे लावून नामर्दपणा करतायत
सत्यपाल मलिक यांनी पुलवामाचे सत्य सांगितले. काश्मीर बद्दल बोलले आता त्यांच्या मागे सीबीआय लावली. पुन्हा काश्मीरात जवान मारले गेले, पण अमित शहा निवडणूक प्रचारात कर्नाटकात. मलिक यांना काही बोलू नका म्हणून सांगितले. काही लोक लाचारी म्हणून तुमच्याकडे येतात. मग तुम्ही काय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडता. यांना भारतमातेचे कुठलेही पक्ष नको फक्त भाजप ठेवायची आहे. २०१४ युती तुटल्याची आठवण येते. तेव्हा खडसेंच्या गळ्यात युती तोडल्याचॆ खापर टाकले. आज नाव, चिन्ह नाही पण जनसागर उसळतोय, शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत. आपल्या लोकांना बाहेर कसे जातील हे भाजप प्रयत्न आणि इतर पक्षातील भ्रष्ट पक्षात घेतात. संजय राऊतांचे कौतुक. नितिन देशमुखांची परत येण्याची आठवण. राजन साळवींना त्रास देणे सुरु आहे, वैभव नाईक जे माझ्या सोबत त्यांची छळवणूक ईडी सीबीआय मागे लावली आहे. या एकदाचे जेल भरोच करू. आव्हाने कसले देता नामर्दपणा करतायत. राहुल गांधींबाबत पण तेच त्रास देणे सुरु आहे.
मशालाची धग अशी लावू की सिंहासन हलेल
पाचोरा जिवंत आहे. भगव्यावर गद्दारांचा नाही. ज्याचे स्वतःचे काही नाही तेच चोरी करताहेत. खारघरच्या दुर्दैवी घटनेची आठवण झाली, तर सोहळ्याचा हेतूच वाईट होता. भाजपला आव्हान त्यांनी जाहीर करावे ते मिंधेच्या नेतृत्वात लढणार आहेत का? तुम्ही मोदी आणि चोरलेले धनुष्यबाण घेऊन या मी माझ्या नावावर येतो आग दिसतेय म्हणून निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. आता निवडणुका लावा मी तयार आहे. मशालाची धग अशी लावू की तुमचे सिंहासन हलेल.