सैन्यदलात दलित मागास वर्गाच्या आरक्षणासाठी
पाठपुरावा करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नाशिक : देशासाठी वेळ आली तर बलिदान देणारा दलित समाज असून पाकिस्तानसारख्या देशाच्या शत्रुशी लढताना केलेले बलिदान हे कधीही चांगले आहे. दलित-मागास वर्गाच्या सैन्यदलातील आरक्षणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आठवले आणि पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
आठवले म्हणाले की, जगातील सर्वात जास्त पुतळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत, अमेरिका, जपान, इंग्लडसारख्या विविध देशात त्यांच्या विचारांचा, तत्वांचा आदर केला जातो. त्र्यंबकेश्वर या कुंभमेळ्याच्या भूमीत त्यांचा पुतळा उभारला जात आहे, याचा अभिमान आहे. त्यांनी दिलेला समतेचा, शांततेचा, शिक्षणाच्या तत्वांचा विचार महत्वाचा आहे. देशात रस्ते अपघातात मरण येणाऱ्यांची संख्या एक ते दीड लाख आहे. असे व्यर्थ मरण येण्यापेक्षा सैन्यामध्ये जावून देशासाठी बलिदान देणे चांगले आहे. मागासांच्या हितासाठी पूर्वी अनेक आंदोलने, मोर्चे झाले आहेत. आता आरक्षणासाठी मराठा व विविध समाज मोर्चे काढताना दिसत आहे. समाजातील जातीभेद, तेली, माळी, साळी असा भेद मान्य नसून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला आरक्षण मिळाले पाहिजे. डॉ आंबेडकर यांच्या जीवन कार्यातून सर्वसामान्यांना गरीब, मागास, दलित जनतेला जगण्याचा मार्ग मिळाला. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठ, लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे उच्च शिक्षण घेतलेल्या बाबासाहेबांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी सुरू केली. दलितांच्या उद्धारासाठी महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्यांनी केला. गावच्या पाणवठ्यावर पाणी मिळावे, या सत्याग्रहांमधून ‘आमचा हक्क आम्हाला द्या !’ अशीच मागणी त्यांनी मांडली, सम्राट अशोकाइतकाच डॉ आंबेडकरांचा संघर्ष महत्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. अपूर्व हिरे, नगराध्यक्षा श्रृती धारणे, नगरसेविका अनिता बागुल, अनघा फडके, नगरसेवक संतोष कदम, पुतळा अनावरण समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे, माजी आमदार शिवराम झोले, प्रकाश लोंढे आदी उपस्थित होते.