मुंबई : मागील वर्षाच्या तुलनेत मध्य रेल्वेचे उत्पन्न ९ कोटीने वाढल्याची माहिती मध्य रेल्वेचे प्रबंधक रामकरण यादव यांनी दिली. मागील वर्षी नोव्हेंबर २०२२ पर्यंत ९४ कोटी इतकं रेल्वेचं उत्पन्न होतं तर या वर्षा अखेर हे उत्पन्न १०३ कोटीपर्यंत जाऊन पोहचलंय. याच उत्पन्नाच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना भविष्यात विविध सुखसोई पुरवण्याचा मानस मध्य रेल्वेचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे स्टेशन आणि आणखी काही स्टेशनचा या माध्यमातून कायापालट करण्याचे काम सुरू होणार आहे. शिवाय रेल्वे हद्दीत वाढलेली गुन्हेगारी कमी करण्यात आणि ११२१ अल्पवयीन मुलांना रेस्क्यू करण्याचे काम रेल्वे पोलिसांनी केल्याची माहिती यादव यांनी दिली.त्याच बरोबर रेल्वे प्रवाशांचा UTS अँपच्या वापरही वाढला असून तो वापर १५.७ टक्के इतका झाला आहे. पावसाळ्याच्या काळात पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणा कोलमडते ,त्या सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या मशीन या वॉटरप्रूफ केल्याने पावसाळ्यात सिग्नल यंत्रणा फेल होण्याचं प्रमाण कमी होईल अशी देखील माहिती रेल्वे प्रबंधकानी दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या मध्य रेल्वेच्या कार्यालयात या संदर्भाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.