Central government approves the naming of Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad!

मुंबई, 24 फेब्रुवारी: शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेल्या औरंगाबादचे संभाजी नगर तर उस्मानाबादचे धाराशिवअसे नामकरण करण्यालाअखेर केंद्र सरकारनेमंजुरी दिलो आहे.

त्यामुळे यापुढे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव असणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं संपूर्ण राज्यभरातून स्वागत होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

परंतु याचं श्रेय माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना दिलं आहे. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलं आहे.

“औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’, राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे कोटी-कोटी आभार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी… औरंगाबादचे #छत्रपती_संभाजीनगर., उस्मानाबादचे #धाराशिव… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनःपूर्वक आभार, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या निर्णयानंतर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.

“मनापासून खूप आनंद होत आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350वे वर्ष सुरू होत असताना ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा 40 दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद हे नाव होतं. ते बदलून आज छत्रपती संभाजीनगर नाव होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा : आलेगाव वनपरिक्षेत्रातील भ्रष्टाचार प्रकरण चिघळण्याचे संकेत

नामांतराचं श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांना : चंद्रकांत खैरे

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. ‘ केंद्राचं अभिनंदन, मात्र हे श्रेय मुख्यमंत्र्यांचं नसून फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे आहे, असे मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची मागणी पूर्ण झाली : संजय गायकवाड

“बाळासाहेब ठाकरे यांची जुनी मागणी पूर्ण झाली. बाळासाहेबांनी संभाजीनगरवर सुरुवातीपासूनच प्रेम केलेलं आहे. केंद्र सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता सरकारने उस्मानाबादसह अहमदनगर आणि खेड्यापाड्यातील गावांची नावे बदलवायला पाहिजे. मोठ्या जल्लोषात नामांतर सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात आम्ही साजरा करणार आहोत, असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य : राज ठाकरे

औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य, असे ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!