ठाणे : कळव्यात लसीकरण मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलेला बॅनर काही अज्ञातांनी फाडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र बॅनर फाडल्याचा सीसीटिव्ही व्हिडीओ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलाय. आता तरी पोलीस कारवाई करतील का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
लसीकरणाबद्दल जनजागृती करणारं आणि माहिती देणारं बॅनर राष्ट्रवादीकडून लावण्यात आलं होतं. हे बॅनर फाडून टाकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून माहिती दिली. तसेच पोलिसांनी दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले तर आपली जबाबदारी नाही, असं आव्हाड म्हणाले होते. दुसरीकडे याच मुद्दयार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी लसीकरणावरून थेट शिवसेना आणि प्रशासनावर टीका केल्याने शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने आली आहे.
या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सायंकाळी पुन्हा एक ट्वीट केलं. ज्यात एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ असून, यात काही हालचाली कैद झालेल्या आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यामध्ये एनसीपीचे बॅनर फाडणाऱ्या गुन्हेगारांचा पुरावा पोलीस कारवाई करणार का? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.