कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पथनाट्य
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अभिनव उपक्रम
ठाणे : डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करावा या हेतूने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात पथनाटयाद्वारे जनजागृती करण्यात आली. डॉ काशिनाथ घाणेकर समोरील मार्गावर हैप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते त्यात या पथनाट्यानी शेकडी प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रबोधनही केले. यातील कलाकारांनी प्रेक्षकांची वाहवाही मिळविली तसेच डिजिटल पेमेंट विषयी उत्सुकतेने माहितीही घेतली.
जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर करावा यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, महावितरण, सर्व तहसील कार्यालये, शिधावाटप यंत्रणा तसेच इतर शासकीय कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. बँकांना सुद्धा त्यांची बचत खाती मोबाईल तसेच आधारशी संलग्न करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच लोकांमध्ये देखील जागृती व्हावी यासाठी काही अभिनव उपक्रम येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणार आहेत. विशेषत: विद्यार्थी, रिक्षा संघटना , छोटे व्यापारी यांची मदत घेण्यात येईल.
प्रभावी पथनाट्य
मोबाईलवरील भीम एपचा उपयोग करून कुठल्याही कटकटीशिवाय स्मार्ट पेमेंट कसे करावे याची माहिती पथनाट्यात रंजक पद्धतीने देण्यात येत होती. रुग्णालये असो किंवा दैनंदिन वस्तू खरेदी असो, बँकेचे व्यवहार असो किंवा कुणाला पैसे ट्रान्स्फर करणे असो, डिजिटल पेमेंटचा संदेश देणारे पथनाट्य प्रेक्षकांना खूप आवडले. या पथनाट्याच्या वेळी एलईडी स्क्रीनचा चांगला उपयोग करून घेण्यात आला होता.
आकर्षक व्हिडीओ क्लिप्स
डिजिटल पेमेंटचा उपयोग करून स्मार्ट बना असा संदेश देणाऱ्या ४ उत्तम व्हिडीओ क्लिप्स रुपेश सिकंद यांनी तयार केल्या असून ठाण्यातील सर्व चित्रपटगृहातून दाखविण्यात येत आहेत. ठाण्यातील श्रीराम भिडे यांच्या यंगिस्तान स्टुडीओमार्फत सर्वसामान्यांना कॅशलेस पेमेंट कसे करावे ते सांगणाऱ्या छोट्या आकर्षक क्लिप्स सध्या सोशल मीडियातून गाजत आहेत. याशिवाय शहरात ठिकठिकाणी होर्डींग्सहि लावण्यात आल्या असून डिजिटल पेमेंटच्या विविध पर्यायांची माहिती यात देण्यात आली आहे.
मॉल्समधून जनजागृती
ठाण्याच्या विवियाना मॉल आणि कोरम मॉलच्या सहकार्याने ३१ डिसेंबर व त्यापुढे देखील ग्राहकांनी कॅशलेस व्यवहार करण्यास प्रोत्साहन द्यावे म्हणून खरेदीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भाग्यवंत ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.