मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम सारख्या महत्वाच्या खत्याचे मंत्री रवींद्र चव्हाण हे आमदारांचे फोन टाळत असल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केली. मंत्री चव्हाण यांच्या या कृतीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संतापले. त्यांना दालनात बोलवून समज देऊ असे अध्यक्षांनी यावेळी सूचित केले.
गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्या ऑनलाईन सेवा चालत नसल्याचा मुद्दा आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. यावेळी आमदारांनी तेथील रस्ते, वीज समस्याही मांडली. यावेळी काँग्रेसचे आमदार नाना पटोले बोलताना म्हणाले की, गडचिरोली जिल्हा हा दुर्गम भाग असून, याठिकाणी नेट सुविधा मिळत नसल्याने शासनाच्या ऑनलाईन सेवेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही. तिथले रस्ते खराब आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांनी तिथे एकदा भेट द्यावी अशी सूचना त्यांनी केली. त्यावेळी मंत्री चव्हाण यांनी मी स्वतः नाना आपण जाऊ असे उत्तर दिले. त्यावर नाना म्हणाले की, मंत्री पहिल्यांदा अधिवेशनात दिसले. ते फोनही उचलत नाही अशी तक्रार नानांनी विधानसभा अध्यक्षांकडे मांडली त्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दालनात बोलवून समज देण्यात येईल असे सूचित केले.
======
कॅबिनेट मंत्री झाले नागरिकांना विसरले….
रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आमदार आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. आता सत्ता संघर्षाच्या काळात चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावल्याने त्यांना बक्षिसी म्हणून कबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र कॅबिनेट मंत्री झाल्यापासून फोन उचलणे बंद केले आहे. सामान्य नागरिक, कार्यकर्ते, पत्रकारांच्याही असंख्य तक्रारी नेहमीच एकायला मिळतात .आता तर चव्हाण हे आमदारांचे ही फोन उचलत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी मंत्री रवींद्र चव्हाण फोन उचलत नसल्याची तक्रार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. अध्यक्षांनीही दालनात बोलवून समज देऊ असे सूचित केले. त्यामुळे अध्यक्षांच्या सूचनेनंतर आता तरी मंत्री चव्हाणांच्या स्वभावात बदल होईल का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
———-