संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल सात वर्षानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाडयासाठी जवळपास ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीमध्ये सिंचन प्रकल्पावर १४ हजार कोटी, तसेच सार्वजनिक बांधकामासाठी १२ हजार ९३८ कोटी, ग्रामविकाससाठी १ हजार १९१ कोटी, कृषीविभागासाठी ७०९ कोटी, तसेच वैद्यकीय विभागासाठी ४९८ कोटी खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सिंचनावरील १४ हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे १३ हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण २७ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाडयासाठी ही मोठी भेट ठरली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजची कॅबिनेटची बैठक छत्रपती संभाजीनगरला झाली. या बैठकीबद्दल खूप चर्चा कालपासून ऐकत होतो. परंतु खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक येथे झाली. यापूर्वीची बैठक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१६ ला झाली होती. गेल्या वर्षभरात महायुतीने केवळ सर्वसामान्यांचं हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही. त्याची अमलबजावणी करतो. आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही अधिकृत नावे केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विरोधकांना टोला
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही टोला लगावला. मुख्यमंत्री म्हणाले, एवढंच नाही तर आम्हाला जे नावं ठेवत आहेत त्यांना जरा सांगा की आम्ही फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो आहोत. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक येथे आले होते तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते पुढच्या वेळी त्यांना थोडा अभ्यास करायला सांगा असाही टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.
दरम्यान पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत आले नाहीत का ? असा खोचक सवाल केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. संजय राऊतांनी उपस्थित राहणार असे जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांची परिषद वादळी ठरण्याची चर्चा सुरु होती.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होतेय. पण ही बैठक होऊच नये यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले होते. मागील बैठकीत आम्ही ३१ निर्णय घेतले होते. २०१७ मध्ये यातील १० विषय मार्गी लागले. सध्या त्यापैकी २३ कामे पूर्ण झाली आहेत. ७ कामे प्रगती पथावर आहेत,” असं फडणवीस यांनी सांगतले.